Press "Enter" to skip to content

मराठी भाषा गौरव दिन- २७ फेब्रुवारी – किमान एक मराठी पुस्तक भेट देऊन साजरा करा!

(कालची पत्रकार परिषद)

या उपक्रमाबाबत पत्रकारांना माहिती देण्यासाठीची पत्रकार परिषद काल पत्रकार भवन येथे संपन्न झाली. यावेळी म.सा.प.चे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद जोशी, स्टोरीटेलचे श्री. योगेश दशरथ व श्री. प्रसाद मिरासदार, थिंकबँकचे विनायक पाचलग व प्रकाशक संघातर्फे आपले मा. अध्यक्ष राजीव बर्वे व मी- पराग लोणकर उपस्थित होतो.

उपस्थित पत्रकार मंडळींची संख्या आत्तापर्यंत मी पाहिलेल्या पत्रकार परिषदांच्या तुलनेत खूप जास्त होती व सर्व मान्यवरांची या उपक्रमाबद्दलची निवेदने झाल्यानंतर समोरून आलेल्या प्रश्नांवरही सविस्तर संवाद झाला.

२७ फेब्रुवारी रोजी किमान एक मराठी पुस्तक भेट देऊन मराठी गौरव दिन साजरा करा, असे आवाहन आपल्या अध्यक्षांनी केले.

मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त साधून आपला संघ ग्रंथ विक्री वाढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून-

१) या उपक्रमाचा प्रसार करणारी पोस्टर्स छापणे व प्रकाशक व ग्रंथ विक्रेत्यांना त्यांच्या कार्यालयांत/दुकानांत प्रदर्शित करण्यासाठी देणे;

२) प्रकाशक संघाच्या संकेतस्थळावर, फेसबुकवर व whatsapp मंचावर या उपक्रमाची प्रसिद्धी करणे;

३) सर्व प्रकाशकांना या उपक्रमांत सहभागी करून २७ फेब्रुवारी रोजी आपापल्या पुस्तकांवर विशेष सवलती जाहीर करण्याची विनंती करणे;

४) महाराष्ट्रभरातून ५ कोटी रुपयांच्या ग्रंथ विक्रीची उलाढाल या एकाच दिवशी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे; आणि यासाठी आणखी अभिनव मार्ग सुचविणे;

– असे या मोहिमेचे सर्वसाधारण स्वरूप आहे, हे आपल्या अध्यक्षांनी स्पष्ट केले.

चला तर मग, या निमित्ताने आपणही सर्व जण या अभिनव मोहिमेत सहभागी होऊयात.

– प्रमुख कार्यवाह