नमस्कार
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. मराठी प्रकाशन क्षेत्रात सुपरिचित असलेल्या काही व्यावसायिकांनी १९९६ च्या विजयादशमीच्या दिवशी ‘अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघा’ची स्थापना केली व संस्थेची, सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट व ट्रस्ट अॅक्ट या कायद्यानुसार रीतसर नोंदणी केली. (रजिस्ट्रेशन नं. F14054/Pune – Date 15Oct.1997) आज मराठीतील बहुतेक सर्व मान्यवर प्रकाशक संस्था संघाच्या सभासद आहेत. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ ही मराठी प्रकाशकांची प्रातिनिधिक संस्था झालेली आहे. महाराष्ट्रांतील अनेक ग्रंथ विक्री योजनांत आणि राष्टीय पातळीवर फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स तर्फे आयोजित अनेक प्रदर्शने व ग्रंथविषयक कार्यक्रमांत संघाने मराठी प्रकाशकांचे प्रतिनिधित्व केले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स या भारतीय प्रकाशकांच्या मध्यवर्ती संस्थेशी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ संलग्न आहे.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ ही एक व्यवसायिकांची संघटना असली तरी ती केवळ प्रकाशकांच्या हक्कांचा आग्रह धरणारी व त्यासाठी मागण्या करणारी संघटना नाही. मराठी प्रकाशन क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी, व्यावसायिक पातळीवर शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती रुजवून व्यावसायिकता जोपासण्याचा प्रयत्न व सामाजिक पातळीवर ग्रंथसंस्कृतीचे संवर्धन ही अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची मूलभूत उद्दिष्टे आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यावसायिकांचे प्रशिक्षण, प्रकाशन व्यवसायापुढील प्रश्नांसंबंधी संबधितांचे व ग्रंथ रसिकांचे प्रबोधन, मराठी ग्रंथांचा व वाचनवृत्तीचा प्रचार व प्रसार ही प्रमुख धोरणे आहेत. या धोरणांनुसार विविध उपक्रम अ.भा.म.प्रकाशक संघामार्फत राबविले जातात.
‘अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ’ हा फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स या प्रकाशकांच्या शिखर संस्थेशी संलग्न आहे. त्याचप्रमाणे नॅशनल बुक ट्रस्ट या ग्रंथ-संस्कृती-संवर्धक निम-सरकारी संस्थेशी संपर्क राखून आहे. या दोन्ही संस्थांमार्फत होणाऱ्या उपक्रमांत संघ नेहमीच सहभागी होत असतो. राष्ट्रीय ग्रंथ प्रदर्शने, ग्रंथ जत्रा यांत मराठी प्रकाशकांचे प्रतिनिधीत्व करतो. या राष्ट्रीय संस्थांमार्फत परदेशात होणाऱ्या उपक्रमांसाठी मराठी पुस्तके उपलब्ध करून देण्याचे कामही करतो. राष्ट्रीय पातळीवर ग्रंथ निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांसाठी व प्रकाशकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी मराठी प्रकाशकांना माहिती देणे व फेडरेशनला मदत करणे ही कामे संघामार्फत सुरवातीपासून केली जात आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सच्या दिल्लीबाहेर आयोजित होणाऱ्या पहिल्या ३ दिवसीय अखिल भारतीय प्रादेशिक भाषा-प्रकाशकांचे संमेलनाचे यजमानपद भूषविण्याचा मानही अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाला मिळालेला आहे.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ कार्यकारी मंडळ