Press "Enter" to skip to content

विविध उपक्रम

व्यावसायिक प्रशिक्षण

प्रकाशन व्यवसायाचे पद्धतशीर शिक्षण देणारे अभ्यासक्रम महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यापीठांत नाहीत. नॅशनल बुक ट्रस्ट व इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिशिंग, नवी दिल्ली यांच्या मार्फत काही अभ्यासक्रम योजले जातात; परंतु हे अभ्यासक्रम बहुदा इंग्लिश माध्यमातील असतात व तेही बहुश: दिल्लीत होतात. सर्व सामान्य मराठी व्यावसायिकाला, व्यवसाय सोडून काही आठवडे / महिने दिल्लीला स्वत: जाणे अगर एखाद्या माणसाला पाठविणे सोयीचे नसते. शिवाय पुष्कळदा या अभ्यासक्रमातून प्रादेशिक भाषेतील प्रकाशकांच्या गरजांचा पुरेसा विचार केलेला असतोच असे नाही. या सर्व दृष्टीने संघामार्फत प्रकाशन व्यवसायाच्या सर्व अंगांची माहिती करून देणारे अभ्यासक्रम आयोजित केले आहेत. शिवाय “प्रकाशन व्यवसाय परिचय”(लेखक – शरद गोगटे) हे पुस्तकही अ.भा.म.प्रकाशक संघाने प्रकाशित केले आहे. पुस्तक प्रकाशनाचा हा प्रकल्प व्यावसायिक प्रशिक्षणाला पूरक आहे.

हस्तलिखिताचं पुस्तक होण्याची प्रक्रिया सुरवंटाचं फुलपाखरू होण्याइतकीच रोमांचक आहे. हा संपूर्ण स्वरूपात्मक बदल प्रकाशक घडवत असतो. या बदलाच्या हस्तलिखित वाचन व स्वीकार, संपादन, रूपांकन, मुद्रण, बांधणी या प्रत्येक टप्प्यावर प्रकाशक काय करतो, किंवा त्यानं काय करावं याची क्रमवार माहिती देणारं मराठीतील पाहिलंच पुस्तक.

पुस्तक तयार झाल्यावरही प्रकाशकाची कामं संपत नाहीत. पुस्तकाचा प्रसार व विक्री ही त्याचीच जबाबदारी. याचाही विचार पुस्तकात केला आहे. प्रकाशनाचे अर्थकारण, व्यवस्थापन व सर्व संबंधित कायदे यांचाही आवश्यक तपशील दिला आहे. या शिवाय परिशिष्टांतून युनेस्कोची ग्रंथसनद व इतर उपयुक्त माहिती दिली आहे.

‘युनेस्को’ नी केलेली पुस्तकाची व्याख्या – ‘पुस्तक म्हणजे मलपृष्ठाव्यतिरिक्त किमान ४९ पृष्ठे असलेले व नियतकालिक नसलेले मुद्रित प्रकाशन’. (A book is a non-periodical printed publication of not less than 49 pages exclusive of covers.)

या पुस्तकाचे लेखक शरद गोगटे हे एम.ए., एल.एल.बी. असून १९६३ पासून ग्रंथ व्यवसायात. १९६८ साली ग्रंथविक्रीच्या स्वतंत्र व्यवसायाला प्रारंभ. १९७५ साली ‘शुभदा-सारस्वत’ या नावाने स्वतंत्र प्रकाशनसंस्थेची स्थापना. पुणे विद्यापीठाच्या संपादन व वृत्तविद्या विभागाच्या पदवी व पदव्युत्तर विध्यार्थांना ग्रंथ प्रकाशन हा विषय शिकवत. प्रकाशनविषयक अभासक्रमांसाठी अतिथी प्राध्यापक. २००१ पासून व्यवसायातून निवृत्त. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या स्थापनेपासून २००५ पर्यंत संघाचे अध्यक्ष.

(‘प्रकाशन व्यवसाय परिचय’ लेखक – शरद गोगटे हे पुस्तक अ.भा.म.प्रकाशक संघाच्या कार्यालयात विक्रीस उपलब्ध आहे.)

व्याख्याने, चर्चा व मुलाखतींचे आयोजन

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघा कडून वेळोवेळी, निर्मिती स्वामित्व हक्क(copy right), ग्रंथ वितरण, आंतरराष्ट्रीय प्रमाणित ग्रंथ क्रमांक(ISBN), पायरसी या व प्रकाशन व्यावसायिकांना उपयोगाच्या अनेक विषयांवर व्याख्याने, चर्चा व मुलाखती यांचे संघामार्फत आयोजन केले जाते. तसेच प्रकाशकांच्या अडचणी व समस्यांवर चर्चा सत्राचे आयोजन अ.भा.म.प्रकाशक संघामार्फत केले जाते.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, ग्रंथखरेदी – २०१५

राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानातर्फे – शासनमान्य ग्रंथालय संचालनाकडून २०१३-१४ या वर्षा मधील ग्रंथखरेदी नोव्हेंबर २०१५ या महिन्यात करण्यात आली. याकरिता संघामार्फत ऑर्डर प्राप्त ४२ प्रकाशकांची पुस्तके पाठवण्याची व्यवस्था संघामार्फत करण्यात आली. दरवर्षी संघामार्फत ही व्यवस्था करण्यात येते व पाठपुरवठा करण्यात येतो.

प्रेस अॅक्टनुसार शासकीय ग्रंथालयांना पुस्तके पाठविणे

अ.भा.म.प्रकाशक संघाकडून प्रेस अॅक्टनुसार शासकीय ग्रंथालयांना पुस्तके पाठविली जातात. ही योजना संघाच्या सर्व सभासदांसाठी सशुल्क उपलब्ध आहे.