पुणे कार्यशाळा
अ.भा.म.प्रकाशक संघाच्या स्थापनेनंतर प्रकाशन व्यवसायात काम करणाऱ्या व नव्याने या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने अशा दोन दिवसीय कार्यशाळा पुणे विद्यापीठाच्या वृत्तविद्या विभागात घेण्यात आल्या. या कार्यशाळेत शरद गोगटे, अविनाश पंडित, विश्वास दास्ताने, सुनील अंबिके, शशिकला उपाध्ये, राजीव बर्वे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत उपस्थितांपैकी अनेकांनी प्रकाशन व्यवसाय सुरु केला व ते आजही या क्षेत्रात काम करत आहेत.
नागपूर कार्यशाळा २००४
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे नागपूर शहरात २००४ साली दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रकाशक, विक्रेते व प्रकाशन व्यवसायात नव्याने येण्यास इच्छुक विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेत अ.भा.म.प्रकाशक संघाच्या प्रतिनिधींनी पुढील विषयांवर मार्गदर्शन केले. प्रकाशन व्यवसायात येताना व संहिता संपादन – शशिकला उपाध्ये, संदर्भ ग्रंथांचे संपादन – शरद गोगटे, डी.टी.पी. – निनाद पांडे, प्रुफ रीडिंग – अविनाश पंडित, कागदाची निवड व प्रिंटिंग – विज्ञानेश्र्वर बनहट्टी, निर्मिती खर्च, पुस्तकाची किंमत व नफा – मकरंद कुलकर्णी, पुस्तकाची जाहिरात व मार्केटिंग – विनोद लोकरे.
अशा प्रकारची कार्यशाळा २००५ मध्ये नाशिकमध्येही आयोजित करण्यात आली.
इंदूर कार्यशाळा २२ व २३ नोव्हेंबर २०१५
मुक्त संवाद, मध्यप्रदेश मराठी अकादमी भोपाळ, लिवा (लिहा-वाचा) क्लब इंदूर आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इंदूर येथे २२ आणि २३ नोव्हेंबर २०१५ या दोन दिवसांमध्ये लेखक-प्रकाशक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. इंदूर येथे संपन्न झालेल्या या कार्यशाळेकरता अ.भा.म.प्रकाशक संघाचे प्रतिनिधीत्व राजीव बर्वे, शरद गोगटे, अविनाश पंडित, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, सुकुमार बेरी आणि पराग लोणकर यांनी केले. यजमान संस्थेच्या अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच पाच सत्रांत संघाच्या प्रतिनिधींची व्याख्याने झाली. तसेच कार्यशाळेत ३० सहभागी प्रतिनिधी होते ज्यांतील प्रामुख्याने इंदूर शहरातील होते. भोपाळचे काही प्रतिनिधी सहभागी होते. या कार्यशाळेत या प्रतिनिधीच्या सहभाग प्रवेशासाठी आकार नव्हता. संघातर्फे सहभागी प्रतिनिधींना लेखन साहित्य, ‘प्रकाशन व्यवसाय परिचय’ हे संघातर्फे प्रकाशित करण्यात आलेले शरद गोगटे सरांचे पुस्तक आणि एडिटमित्र या संस्थेतर्फे प्रकशित संपादन या विषयाला वाहिलेला शब्दस्पर्श (२०१४चा दिवाळी अंक) यांचा समावेश असलेला संच देण्यात आला. ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरता यजमान संस्थेचे विश्वनाथ शिरढोणकर, अश्विन खरे, अरविंद जेवणेकर यांनी मोठे परिश्रम केले व त्यांचे अ.भा.म.प्रकाशक संघाला मोलाचे सहकार्य लाभले.