Press "Enter" to skip to content

‘प्रकाशक संघा’विषयी

अ.भा.मराठी प्रकाशक संघाविषयी

मराठी प्रकाशन क्षेत्रात सुपरिचित असलेल्या काही व्यावसायिकांनी १९९६ च्या विजयादशमीच्या दिवशी ‘अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघा’ची स्थापना केली व संस्थेची, सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट व ट्रस्ट अॅक्ट या कायद्यानुसार रीतसर नोंदणी केली. (रजिस्ट्रेशन नं. F14054/Pune – Date 15Oct.1997) आज मराठीतील बहुतेक सर्व मान्यवर प्रकाशक संस्था संघाच्या सभासद आहेत. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ ही मराठी प्रकाशकांची प्रातिनिधिक संस्था झालेली आहे. महाराष्ट्रांतील अनेक ग्रंथ विक्री योजनांत आणि राष्टीय पातळीवर फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स तर्फे आयोजित अनेक प्रदर्शने व ग्रंथविषयक कार्यक्रमांत संघाने मराठी प्रकाशकांचे प्रतिनिधित्व केले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स या भारतीय प्रकाशकांच्या मध्यवर्ती संस्थेशी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ संलग्न आहे.

ग्रंथ प्रचार व प्रसार

पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरांच्या बाहेर पाठ्येतर पुस्तकांची नियमित विक्री करणारे ग्रंथ विक्रेते पुरेसे नसल्यामुळे नवीन ग्रंथ रसिकांना बघायला मिळत नाहीत. त्यांच्यासाठी फक्त नवीन पुस्तकांची प्रदर्शने पुणे-मुंबईच्या बाहेर करण्याचे प्रयोग अ.भा.म.प्रकाशक संघाने केले आहेत. अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या व्दैवार्षिक संमेलन प्रसंगी मराठी पुस्तकांचे प्रदर्शन; असे अनेक उपक्रम अ.भा.म.प्रकाशक संघामार्फत झाले आहेत.

या शिवाय दरवर्षी जागतिक ग्रंथ दिन (२३ एप्रिल) आणि राष्ट्रीय ग्रंथ सप्ताह (१४ ते २० नोव्हेंबर) संघामार्फत साजरे केले जातात. त्या काळात समाजातील ग्रंथवृत्ती वाढविण्यासाठी व ग्रंथ प्रसारासाठी विविध उपक्रम केले जातात. महाराष्ट्रभर व जगभरही विखुरलेल्या मराठी ग्रंथरसिकांना नव्या पुस्तकांची माहिती देण्यासाठी मासिक, मुखपत्र व वाचन छंद-स्पर्धेसारख्या काही योजना राबवण्याचा अ.भा.म.प्रकाशक संघाचा विचार आहे.

या शिवाय मराठी पुस्तकांची इतर भाषांमधून- विशेषत: भारतीय भाषांमधून व इतर भाषांतील निवडक पुस्तके भाषांतराव्दारा मराठीतून उपलब्ध करून देण्यासाठी काही कार्यक्रम नियमितपणे करता येतील का याचा विचार चालू आहे. एक प्रयोग म्हणून मराठीतील सुमारे ५० पुस्तकांचे इंग्लिश सारांश असलेली स्मरणिका पुणे येथील अखिल भारतीय प्रादेशिक भाषा प्रकाशकांचा संमेलनात प्रकाशित करून वितरित केली होती.

व्यवसायापुढील प्रश्नांबाबत प्रबोधन

कोणत्याही व्यवसायापुढील प्रश्नांना नेहमीच व्यावसायिक व सामाजिक अशा दोन बाजू असतात. व्यवसायांचे कुशल व तत्पर व्यवस्थापन आणि प्रकाशकांची आर्थिक क्षमता या गोष्टी परस्परावलंबी आहेत, म्हणून व्यावसायिक प्रशिक्षणाचे व उद्बोधनाचे कार्यक्रम संघ राबवीत आहे. शास्त्रशुद्ध, कुशल व आर्थिकदृष्ट्या सक्षम प्रकाशक हे समाजाच्या दृष्टीनेही अधिक उपकारक ठरतात. कारण ते चोखंदळपणे चांगली पुस्तके योग्य अशा किमतींना देऊ शकतात. अशी चांगली पुस्तके बाजूला सारली न जाता सरकारी व इतर आदेशीय खरेदी ही रास्त वटावाने व स्वच्छ पद्धतीने होणे हे समाजाच्या दृष्टीने हितकर असते. संघातर्फे या संदर्भांत प्रश्नांची रास्त बाजू योग्य ती माहिती संबंधितांच्या नजरेला आणण्याचा प्रयत्न केला जातो.

व्यावसायिक प्रशिक्षण

प्रकाशन व्यवसायाचे पद्धतशीर शिक्षण देणारे अभ्यासक्रम महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यापीठांत नाहीत. नॅशनल बुक ट्रस्ट व इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिशिंग, नवी दिल्ली यांच्या मार्फत काही अभ्यासक्रम योजले जातात; परंतु हे अभासक्रम बहुदा इंग्लिश माध्यमातील असतात व तेही बहुश: दिल्लीत होतात. सर्व सामान्य मराठी व्यावसायिकाला, व्यवसाय सोडून काही आठवडे / महिने दिल्लीला स्वत: जाणे अगर एखाद्या माणसाला पाठविणे सोयीचे नसते. शिवाय पुष्कळदा या अभ्यासक्रमातून प्रादेशिक भाषेतील प्रकाशकांच्या गरजांचा पुरेसा विचार केलेला असतोच असे नाही. या सर्व दृष्टीने संघामार्फत प्रकाशन व्यवसायाच्या सर्व अंगांची माहिती करून देणारे अभ्यासक्रम आयोजित केले आहेत. शिवाय “प्रकाशन व्यवसाय परिचय”(लेखक – शरद गोगटे) हे पुस्तकही अ.भा.म.प्रकाशक संघाने प्रकाशित केले आहे.

शिवाय वेळोवेळी, निर्मिती स्वामित्व हक्क(copy right), ग्रंथ वितरण, आंतरराष्ट्रीय प्रमाणित ग्रंथ क्रमांक (ISBN), पायरसी या व प्रकाशन व्यावसायिकांना उपयोगाच्या अनेक विषयांवर व्याख्याने, चर्चा, मुलाखती यांस सारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

अनुषंगिक कामे

‘अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ’ हा फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स या प्रकाशकांच्या शिखर संस्थेशी संलग्न आहे. त्याचप्रमाणे नॅशनल बुक ट्रस्ट या ग्रंथ-संस्कृती-संवर्धक निम-सरकारी संस्थेशी संपर्क राखून आहे. या दोन्ही संस्थांमार्फत होणाऱ्या उपक्रमांत संघ नेहमीच सहभागी होत असतो. राष्ट्रीय ग्रंथ प्रदर्शने, ग्रंथ जत्रा यांत मराठी प्रकाशकांचे प्रतिनिधीत्व करतो. या राष्ट्रीय संस्थांमार्फत परदेशात होणाऱ्या उपक्रमांसाठी मराठी पुस्तके उपलब्ध करून देण्याचे कामही करतो. राष्ट्रीय पातळीवर ग्रंथ निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांसाठी व प्रकाशकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी मराठी प्रकाशकांना माहिती देणे व फेडरेशनला मदत करणे ही कामे संघामार्फत सुरवातीपासून केली जात आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सच्या दिल्लीबाहेर आयोजित होणाऱ्या पहिल्या ३ दिवसीय अखिल भारतीय प्रादेशिक भाषा-प्रकाशकांचे संमेलनाचे यजमानपद भूषविण्याचा मानही अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाला मिळालेला आहे.