Press "Enter" to skip to content

पुरस्कार

उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार

लेखकाचे लेखन पुस्तक स्वरुपात वाचकांना उपलब्ध होईपर्यंत त्या लेखनाला अनेक टप्पे पार करावे लागतात. जसे संपादकीय संस्कार, मुद्रितशोधन, टायपोग्राफी, ले-आउट मांडणी इत्यादी. त्यानंतर विषयानुरूप पानांची सजावट, प्रत्यक्ष छपाई व बांधणी असे अनेक टप्पे पार करत त्या लिखाणाला पुस्तकाचे स्वरूप प्राप्त होते.

या ग्रंथनिर्मिती प्रक्रियेत प्रकाशकाने दाखवलेल्या कौशल्याची व कल्पकतेची योग्य दखल घेतली जावी आणि ग्रंथ निर्मिती अधिकाधिक चांगली होण्यासाठी प्रकाशकांना प्रोत्साहन मिळावे यांसाठी ‘अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने’ ‘उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार’ हा उपक्रम सुरु केला आहे. ग्रंथ प्रकाशन प्रकियेत ग्रंथनिर्मिती हा एक महत्वाचा घटक असतो. महाराष्ट्रभरच्या अनेक संस्था लेखनासाठी लेखकांना पारितोषिके देत असतात; पण या संस्था किंवा राज्य सरकार पुस्तक निर्मितीच्या क्षेत्रातील जो सर्वांत महत्वाचा घटक म्हणजे प्रकाशक असतो; परंतु त्याचीच दखल घेतली जात नाही. प्रकाशकांसाठी कोणतेही पारितोषिक महाराष्ट्रात नव्हते. ग्रंथनिर्मितीत ग्रंथच्या विषयानुरूप वैविध्य राखण्यासाठी, त्यात आवश्यक कलात्मकता आणण्यासाठी प्रकाशक विविध पातळ्यांवर भूमिका बजावत असतो, कल्पकता दाखवत असतो. या प्रयत्नांची दखल घेण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने २००३ पासून उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार योजना सुरु केली. सर्व प्रकारच्या वाड्मयाच्या पुस्तकांची दखल घेतली जावी या दृष्टीने अ.भा.म.प्रकाशक संघाने पुस्तकांची वर्गवारी केली आहे. विषयांनुसार १५ विभागांमध्ये मिळून एकूण ३० पुरस्कारांची ही योजना आहे. प्रकाशकाला हा पुरस्कार मानचिन्ह व प्रशस्तिपत्र या स्वरुपात प्रदान करण्यात येतो. तसेच प्रत्येक सहभागी प्रकाशकास प्रशस्तिपत्र देण्यात येते.

या उपक्रमाची जबाबदारी प्रदीप चंपानेरकर यांनी २००३ ते २००९ या काळात यशस्वीपणे सांभाळी. या कालखंडात ‘उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार’ या उपक्रमाचे एकूण पाच कार्यक्रम संपन्न झाले. प्रदीप चंपानेरकर यांनी वेळोवेळी जाणकारांची निवड सामिती स्थापन करून उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कारासाठी पुस्तकांची निवड करण्यात आली. या निवड समितीत शेखर गोडबोले, सुजित पटवर्धन, अविनाश पंडित, मुकुंद टाकसाळे या सदस्यांनी काम पाहिले. तसेच पुरस्कार वितरण सोहळ्यांसाठी डॉ. अरुण टिकेकर, सुभास अवचट, शि.द. फडणीस, रामदास भटकळ, प्रतापराव पवार, दिलीप माजगावकर, ही पाहुणे मंडळी उपस्थित होती.

१ मार्च २०१३ रोजी, २०१० ते २०१२ मधील पुरस्कार वितरण सोहळा हॉटेल प्रेसिडेंट, प्रभात रोड पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचे पदाधिकारी सुधीर मल्होत्रा यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त प्रकाशकांना पुरस्कार देण्यात आले.

२०१३ व २०१४ मधील पुरस्कार वितरण सोहळा २८ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रकाशकांच्या उत्तम प्रतिसादात जेष्ठ लेखक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ग्रंथ प्रकाशन व ग्रंथ विक्री या क्षेत्रांत दीर्घकाळ उत्तम कामगिरी करण्याऱ्या बेळगाव येथील ‘नवसाहित्य बुकस्टॅाल’ या संस्थेचे जेष्ठ संस्थापक जवळकर बंधू यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

२०१५ मधील उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार वितरण सोहळा १८ सप्टेंबर २०१६ रोजी पत्रकार भवन पुणे येथे संपन्न झाला. या सभारंभात बॉम्बे बुक डेपोचे माजी संचालक श्री. पांडुरंग कुमठा यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते. अ.भा.म. प्रकाशक संघाचे विश्वस्त श्री.शरद गोगटे, पॅाप्युलर प्रकाशनाचे संचालक श्री.रामदास भटकळ हे उपस्थित होते. श्री. रामदास भटकळ यांनी आपल्या भाषणात श्री. पांडुरंग कुमठा यांच्या कार्याविषयी सांगितले. श्री. पांडुरंग कुमठा यांनीही आपले विचार व्यक्त केले. या सभारंभात श्री. पांडुरंग कुमठा यांच्या हस्ते प्रकाशक संघाच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नितीन गोगटे यांनी केले. या समारंभात संघाचे कार्यकारणी सदस्य व अन्य सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०१६ व प्रकाशक मेळावा, केंद्रीय संदर्भ ग्रंथालय, कोलकत्ता व अ.भा.म.प्र. संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २० ऑगस्ट २०१७ रोजी ‘मराठा चेंबर ऑफ कॅामर्स’च्या पद्मजी सभागृहात संपन्न झाला. या सभारंभाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ लेखक, माजी सनदी अधिकारी श्री. लक्ष्मीकांत देशमुख होते. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचलनालयाचे संचालक श्री. किरण धांडोरे व केंद्रीय संदर्भ ग्रंथालय, कोलकत्ता येथील मराठी भाषेच्या सहसंपादक वैष्णवी कुलकर्णी या सभारंभास उपस्थित होत्या. त्यांनी संपादिक केलेल्या ‘मराठी बाल साहित्य सूची – २००१ ते २०१६’ या वेळी प्रकाशित करण्यात आली. तसेच साहित्य अकादमी मराठी भाषा विभागातील युवा पुरस्कार विजेते राहुल कोसंबी व बाल साहित्य पुरस्कार विजेते ल.म.कडू. यांचा सत्कार अ.भा.म.प्रकाशक संघा कडून करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पराग लोणकर यांनी केले.