जीवनगौरव व उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात आणि महाराष्ट्रभरातील (आणि अगदी गोव्यातीलही) पुरस्कारप्राप्त प्रकाशक, संघाचे सभासद प्रकाशक, लेखक, प्रायोजक, पत्रकार आदिंच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला.
सुरुवातीला महाराष्ट्र गीत व दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमात आपल्या प्रकाशक संघाचे मा. अध्यक्ष श्री. राजीव बर्वे यांचे प्रास्ताविक झाले. प्रास्ताविकात प्रकाशक संघ सातत्याने करत असलेल्या विविध कामांचा आढावा मा. अध्यक्षांनी घेतला.
अध्यक्षांच्या प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक श्री. योगेश सोमण यांनी आपल्या मुलाखतीत श्रोत्यांशी अगदी दिलखुलास संवाद साधला, जो सर्व रसिकांची मने जिंकून गेला.
त्यानंतर प्रकाशक संघाचे अतिशय प्रतिष्ठेचे जीवनगौरव व साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार मा. श्री. अशोक मुळे आणि मा. श्री. ल. म. कडू यांना प्रदान करण्यात आले. श्री. ल. म. कडू यांनी आपल्या मनोगतात बालसाहित्याचे महत्त्वं विशद केले, तर श्री. मुळे यांनी आपल्या मनोगतात आपली प्रकाशन व्यवसायाची वाटचाल सांगून पुरस्काराबद्दल प्रकाशक संघाप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.
त्यानंतर निर्मिती पुरस्कार प्रदान कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी स्पर्धेच्या मान्यवर परीक्षकांचा सन्मान करण्यात आला व परीक्षक समितीचे अध्यक्ष श्री. विनायक रानडे यांच्या मनोगताचे श्री. किरण आचार्य यांनी वाचन केले.
यानंतर पुरस्कार प्राप्त प्रकाशकांना व चित्रकारांना मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती व उत्कृष्ट दिवाळीअंक निर्मिती पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रकाशक संघाचे हे पुरस्कार प्रकाशकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे एकमेव पुरस्कार असून, हे देताना प्रकाशक संघास अगदी मनस्वी आनंद व समाधान मिळत असते. यातील आर्थिक बाजू सांभाळण्यामध्ये प्रायोजक व देणगीदारही महत्त्वाची भूमिका बजावतात. या सर्वांचाही समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप माजी साहित्यसंमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्री. भारत सासणे यांनी केला. आपल्या भाषणात श्री. सासणे यांनी नव्या, बदललेल्या वाचन संस्कृतीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रकाशकांनी काय केले पाहिजे यावर मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. अमृता कुलकर्णी आणि श्री. किरण आचार्य यांनी केले. डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.
डॉ. अंजली जोशी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली व नंतर सुग्रास भोजनाचा सर्व उपस्थितांनी आस्वाद घेतला.
धन्यवाद!
प्रमुख कार्यवाह


