आपल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघांचे चौथे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन नुकतेच आपल्या नाशिक शाखेतर्फे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ मे व दि. ७ मे रोजी अतिशय उत्साहात संपन्न झाले.
दि. ६ रोजी ‘महाराष्ट्र गीताने’ जोशात सुरुवात झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात मावळते संमेलनाध्यक्ष श्री. रवींद्र गुर्जर यांच्याकडून सूत्रे स्वीकारून श्री. अशोक कोठावळे संमेलनाध्यक्षपदी विराजमान झाले. मा. आ. छगन भुजबळ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या अतिशय मिश्किल शैलीमध्ये श्री. भुजबळ यांनी एकूणच साहित्य विश्व आणि पुस्तकांचे महत्व यावर भाष्य केले. ज्येष्ठ कवी श्री. अशोक नायगावकर यांचा त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री. भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उद्घाटन कार्यक्रमानानंतर प्रा. श्री. मिलिंद जोशी यांनी श्री. नायगावकर यांच्या घेतलेल्या प्रकट मुलाखतीतील अनेक गंमतीदार किस्से आणि विनोदी कवितांचा पाऊस श्रोत्यांना अगदी मनसोक्त भिजवून गेला. सध्या घडत असलेल्या राजकीय घटना, सामाजिक जीवन, सोशल माध्यमांचा वाढता वापर, होत असलेला अतिरेक आदि बाबींबद्दल नायगावकर यांनी काढलेले चिमटे श्रोत्यांना मनसोक्त हसवून गेले.
*पहिल्या दिवशीचे- ‘प्रकाशन व्यवसायापुढील आव्हाने,’ ‘कुसुमाग्रज ते तात्यासाहेब- साहित्यिक ते समाजसेवक’ आणि ‘काळानुसार दिवाळी अंक बदलतो आहे!’ ही तीनही परिसंवाद उद्बोधक, माहितीपूर्ण आणि संबंधित विषयाचा सर्व बाजूंनी साकल्याने विचार करणारे होते. संध्याकाळी दोन सत्रांमध्ये कवी संमेलन संपन्न झाले, यात फार मोठ्या संख्येने नाशिक व नाशिक बाहेरील कविही सहभागी झाले होते.*
रविवार दि. ७ रोजी पहिल्या सत्रात आपल्या प्रकाशक संघाचे महत्वाचे व प्रतिष्ठेचे जीवन गौरव, साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार आणि प्रकाशकांसाठीचे ग्रंथ व दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार प्रदान करण्यात आले. *संमेलनाध्यक्ष श्री. अशोक कोठावळे, जीवन गौरव पुरस्कार विजेते ज्येष्ठ प्रकाशक श्री. रामदास भटकळ, साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध कवी व लेखक श्री. प्रवीण दवणे व विशेष सरकारी वकील श्री. उज्ज्वल निकम या सर्व मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.*
*दुसऱ्या सत्रात अॅड. श्री. उज्जल निकम यांच्या श्री. विश्वास ठाकूर यांनी घेतलेल्या मुलाखतीने श्रोत्यांची मने जिंकून घेतली.* अनेक बाबींवर श्री. निकम यांनी अतिशय परखड मते व्यक्त केली. विविध खटल्यांत समोर आलेल्या आव्हानांबाबत त्यांनी श्रोत्यांना माहिती दिली. ही मुलाखतही कमालीची रंगली.
*आपल्या गरुडझेप या अत्यंत संग्राह्य स्मरणिकेचे,तसेच अनेक पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन या संमेलनात संपन्न झाले.*
*या संपूर्ण संमेलनात श्री. अशोक कोठावळे, श्री. छगन भुजबळ, श्री. मिलिंद जोशी, श्री. रामदास भटकळ, श्री. प्रवीण दवणे यांसारख्या मान्यवरांची जी भाषणे झाले, त्यांनी संपूर्ण संमेलन एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.* ही सर्वच भाषणे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतानाच सतत हास्याची कारंजी फुलवत होती, ज्यामुळे संपूर्ण संमेलनात सहभागी प्रत्येक व्यक्ती एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती घेताना दिसत होती.
दोन दिवसांचे संमेलन रविवारी सायंकाळी सात वाजता मोठ्या उपस्थितीत अतिशय हृद्य, समर्पक भाषणांनी समाप्त झाले. पोतदार तर भावनातिरेकाने बोलूच शकले नाहीत! आमचाही तेथून पाय निघत नव्हता, पण सायंकाळी सात नंतर आता प्रत्येकाला आपापल्या गावी जाण्याचे वेध लागले होते.
अशा प्रकारचे संमेलन आयोजित करणे, आणि ते यशस्वीपणे संपन्न करणे, हे काम सोपे नसते. प्रकाशक संघाच्या या संमेलनाचे- अतिशय सुंदर नियोजन आणि तितकेच देखणे आयोजन करून हे संमेलन अतिशय यशस्वी केल्याबद्दल नाशिक शाखेचे अध्यक्ष श्री. विलास पोतदार, उपाध्यक्ष श्री. वसंतरावजी खैरनार, कार्यवाह श्री. सुभाष सबनीस, स्वागताध्यक्ष श्री. विश्वास ठाकूर आणि सर्व कार्यकारिणी सदस्य अभिनंदनास पात्र आहेत.





या संमेलनातील सर्वच सत्रांना नाशिक येथील श्रोत्यांची जी उदंड उपस्थिती लाभली ती खूपच समाधान देणारी होती. याचे श्रेय अर्थातच नाशिक शाखेला आहे.
आपल्या प्रकाशक संघाचे मा. अध्यक्ष श्री. राजीव बर्वे यांच्या कुशल नेतृत्वाखाली आम्ही पुणे येथील कार्यकारिणीने या आधीची तीन संमेलने आयोजित केली, ज्यास आपण संघाच्या सदस्यांनी फार चांगला प्रतिसाद दिलात. या नाशिक येथील संमेलनासही महाराष्ट्र भरातून मंडळी आली होती. अशा प्रकारचे संमेलन आयोजित करणे हे एखादे शिवधनुष्य उचलण्यासारखे असते. पाहुण्याच्या, वक्त्यांच्या धरून ५०-६० खोल्यांची वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये आरक्षणे, पाहुण्यांची त्यांच्या शहरातून ने आणण्याची, सभास्थानी आणण्याची व्यवस्था, सर्वांचे व्यवस्थित सन्मान, अतिशय श्रम व आर्थिक तोषीस यामध्ये घेतली जात असताना, सभासदांचा उत्तम प्रतिसाद अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी प्रेरणा देणारा, प्रोत्साहित करणारा ठरत असतो. अशा संमेलनात उपस्थिती ही सर्वांचे संमेलन घडवून आणत असतानाच उत्तमोत्तम कार्यक्रमांचा आस्वाद घडवून आणणारी, नव्या-जुन्या भेटी घडवून आणणारी, काही क्षण दिलखुलास जगण्याचा अनुभव देणारी असते. प्रकाशक संघाच्या २०२४ या पुढील वर्षाच्या पाचव्या लेखक- प्रकाशक साहित्य संमेलनात प्रकाशक संघाचे सभासद याहून अधिक उत्साहाने सहभागी होतील अशी आम्ही आशा करत असतानाच या नाशिक येथील संमेलनात जी सभासद मंडळी, नाशिक बाहेरून खास या संमेलनास उपस्थित राहिली त्या सर्व सदस्यांना व नाशिक येथील आपल्या सर्व सभासदांना आम्ही मन:पूर्वक धन्यवाद देत आहोत.
सर्वात महत्त्वाचे कौतुक व्हायला हवे ते आपले नाशिक शाखेचे अध्यक्ष श्री. विलास पोतदार यांचे! विशिष्ठ मोरपंखी रंगाचे जाकीट घातलेल्या त्यांच्या चाळीस कार्यकर्त्यांची टीम लक्ष वेधून घेत होती, ही टीम आणि संपूर्ण कार्यकारिणी एका दिलाने संमेलनात राबत होती. पोतदारांनी कुठे कसूर ठेवली नव्हती. कार्यक्रमांचा उत्तम दर्जा, व्यवस्थित सन्मान, प्रसन्न व्यासपीठ आणि सभागृह, श्रोत्यांची प्रत्येक कार्यक्रमास भरपूर उपस्थिती, ब्रेकफास्ट, सर्व जेवणे (खूप स्वच्छता पाळून आणि) स्वादिष्ट, वेळोवेळी चहा! आणखी काय हवे! संमेलन कसे करावे याचा एक वस्तुपाठच पोतदार यांनी घालून दिला. त्यांचे खूप खूप अभिनंदन!
अ. भा. मराठी प्रकाशक संघ कार्यकारिणी.