Press "Enter" to skip to content

सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्त ग्रंथालयांना मदत

सांगली नगर वाचनालयाचे झालेले नुकसान कळल्यावर याबाबतची अधिक माहीती आपण मिळवली.

त्यांचे पुस्तकांचे तळमजल्यावर पाच विभाग आहेत. पाणी भरू लागल्यावर दुर्मिळ पुस्तके अगोदर वाचवायची असे त्यांनी ठरवले. तीन विभाग त्यांनी पूर्णपणे वाचवले, पण तेव्हढ्यात पाणी भरू लागले. ८०% दुर्मिळ पुस्तके त्यांनी सुरक्षित ठिकाणी ठेवली आहेत. २०% पुस्तके वाचवता आलेली नाहीत.

तळमजल्यावर दहा दिवस पाणी होते. त्यामुळे संगणक, फर्निचर इत्यादींचेही मोठे नुकसान झाले. त्यांना पहिल्या मजल्यावर पाणी येईल असे वाटत नव्हते, परंतु चार दिवसांनी तोही मजला पाण्याखाली गेला व तेथे गेल्या दहा वर्षातील नवीन पुस्तके होती, ती सर्व बाद झाली आहेत. एकंदर सुमारे चाळीस हजार पुस्तके डोळ्यादेखत संपली आहेत
*अशा तऱ्हेचे नुकसान अनेक सार्वजनिक वाचनालयांचे झाले असण्याचीही शक्यता आहे.* त्याचीही माहिती घेण्याचे संघाचे काम चालू आहे.

याबाबत प्रकाशक संघाने काम करावयाचे ठरवले आहे. या कामासाठी प्रकाशक संघाच्या कार्यकारिणी सदस्यांची प्रकाशक संघाच्या उपाध्यक्षा सौ. शशिकला उपाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन करण्यात आली आहे.

पावसामुळे झालेले वाचनालयांचे नुकसान अपरिमित आणि मोठे आहे. कृपया सर्व प्रकाशकांनी यासाठी पुढे येऊन हातभार लावावा. पुस्तकांव्यतिरिक्त रोख रक्कम अगर चेकनेही देणगी स्वीकारली जाईल व त्याची पावती दिली जाईल. (ही रक्कम वाहतूक खर्च, संगणक वगैरेंसाठी वापरली जाईल.) आपली पुस्तके आणि रकमा कशासाठी, कोणासाठी दिल्या हे अत्यंत परदर्शीपणे अर्थातच कळवले जाईल. *अत्यंत योग्य ठिकाणीच मदत जाईल याची प्रकाशकांनी १००% खात्री बाळगावी.*

चलनांवर *अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पूरग्रस्त सहाय्यता पुस्तक-निधी* असा उल्लेख करावा. प्रकाशक संघ कार्यालयात ही पुस्तके स्वीकारण्याची सुरुवात उद्यापासून करत आहोत. *दुपारी २ ते ६या वेळात ही पुस्तके स्वीकारली जातील व त्याची पोच आपल्या चलनाच्या एका प्रतीवर दिली जाईल.*

नियमित व जास्त प्रमाणात पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांनी कृपया किमान शंभर पुस्तके पाठवावीत ही विनंती! पुस्तके पाठवण्याची कमाल मर्यादा नाही.

या आपण हाती घेतलेल्या मोठ्या आणि अत्यावश्यक प्रकल्पास सढळ हाताने मदत करावी असे सर्व कार्यकारिणीच्या वतीने आवाहन करीत आहे.

*अध्यक्ष*