आपल्या प्रकाशक संघाच्या उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२६ साठी वर्ष २०२५ मधील पुस्तकं अजून पाठवली नसलेल्या प्रकाशकांसाठी याबाबतचे संपूर्ण निवेदन पुढे देत आहोत. कृपया तातडीने आपली पुस्तकं पाठवावीत ही विनंती.
अ. भा. मराठी प्रकाशक संघातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२६साठी वर्ष २०२५ मधील पुस्तकं पाठविण्याबाबत!
नमस्कार!
आपल्या संघातर्फे दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार दिले जातात. वर्ष २०२५ मध्ये प्रकाशित झालेली पुस्तके या स्पर्धेसाठी मागवित आहोत.
१) ललित, २) ललितेतर, ३) संदर्भ, ४) उपयुक्त व छंदविषयक, ५) विज्ञानविषयक, ६) शिशुसाहित्य, ७) बालसाहित्य, ८) कुमारसाहित्य, ९ अ) मुखपृष्ठ (प्रौढ विभाग), ९ ब) मुखपृष्ठ (बाल विभाग), १०) ग्रामीण आणि निमशहरी प्रकाशक, या विभागांबरोबरच ज्या प्रकाशकांनी वर्ष २०२५ मध्ये स्वत:च्या लेखनाची पुस्तके प्रकाशित केली असतील त्यांनी ११) ‘प्रकाशक-लेखक’ पुरस्कारासाठी आपली पुस्तके पाठवावीत. १२) जाहिराती व ग्रंथ प्रचार साहित्यही आपण पाठवू शकता. अशा प्रकारे बारा विभागात प्रकाशक संघाकडून पुरस्कार दिले जातात.
प्रकाशकांना इतर भाषांमधील जास्तीत जास्त उत्तम साहित्य मराठी भाषेत आणणे, व मराठीतील जास्तीत जास्त साहित्य इतर भाषांमध्ये पोहोचवणे यासाठी उत्तेजन, प्रोत्साहन मिळावे, यासाठी मागील २०२५ वर्षापासून आपण अनुवादित पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांसाठी दोन नवीन विभाग यामध्ये समाविष्ट केले आहेत. त्याप्रमाणे १) इतर भाषांमधून मराठीत अनुवाद प्रकाशित केले असतील, ती मराठी पुस्तकं आणि २) मराठीमधून इतर भाषांत अनुवाद प्रकाशित केले असतील, ती अनुवादित भाषेतील पुस्तकं देखील स्पर्धेसाठी पाठवावीत.
तरी प्रकाशकांनी आपल्या दि. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची (पुरस्कार योजनेसाठी सप्रेम भेट वगैरे काहीही मजकूर अथवा शिक्का नसलेली) प्रत्येकी एक प्रत संघाच्या पुढील पत्त्यावर दि. १५ फेब्रुवारी २०२६ पूर्वी पाठवावी. पुस्तकांबरोबर यादी जोडून वरीलपैकी कोणत्या विभागासाठी कोणते पुस्तक पाठवत आहात याचा कृपया उल्लेख करावा. (आपण नमूद केलेल्या विभागापेक्षा वेगळ्या विभागात पुरस्कार देण्याचा परीक्षकांना अधिकार असेल.)
परीक्षकांचा निकाल/निर्णय अंतिम राहील.
महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व पुरस्कार प्रकाशकांसाठी असून मुखपृष्ठासाठीचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकार अशा दोघांनाही प्रदान केले जातील. केवळ प्रकाशकांसाठी असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव पुरस्कार आहेत. समारंभपूर्वक दिमाखदार पद्धतीने हे पुरस्कार प्रदान केले जातात, हे आपण सर्व जाणताच!
उत्तम आणि पुस्तकाच्या अंतरंगातील मजकुराच्या दृष्टीने निर्दोष पुस्तकनिर्मितीमध्ये मुद्रितशोधकाचे फार महत्व असते. ते लक्षात घेऊन प्रकाशक संघातर्फे दर वर्षी एका अनुभवी आणि मुद्रितशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मुद्रितशोधकाचा आपण विशेष सन्मान करत असतो. वर्ष २०२६च्या या पुरस्कारासाठी देखील सभासदांनी नावे सुचवावीत. आपली नावे कृपया ९८५०९६२८०७ (पराग लोणकर – प्रमुख कार्यवाह) यांना वैयक्तिक लेखी कळवावीत. आलेल्या नावांमधून मान्यवर परीक्षक एका नावाची निवड करतील.
पुरस्कारासाठी आलेली पुस्तके प्रकाशकांस परत पाठवली जात नाहीत. या पुस्तकांचा पुढील विनियोग (विक्री-देणगी-संग्रह) करण्याचे स्वातंत्र्य प्रकाशक संघाकडे असते.
पुरस्कारासाठी पात्र होण्यासाठी आपण प्रकाशक संघाचे सभासद असणे आवश्यक आहे. आपण चालू वर्षाची वर्गणी भरलेली नसल्यास कृपया आपल्या कार्यालयीन कार्यवाह (वीणा पेशवे- ९८८१४ ३५६८०) यांना संपर्क करावा.
स्पर्धेसाठी पुस्तकं पाठवण्याबाबत काहीही शंका असल्यास कृपया संघाचे प्रमुख कार्यवाह श्री. पराग लोणकर (९८५०९६२८०७) यांना संपर्क करावा.
आपली पुस्तकं १५ फेब्रुवारी २०२६पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ
२५१ क, शनिवार पेठ, मुठेश्वर चौक, पुणे-४११०३०.
दूरध्वनी: ९८८१४३५६८०.
धन्यवाद!
– प्रमुख कार्यवाह.