नमस्कार!
आपल्या संघातर्फे दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार दिले जातात हे आपण जाणताच. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०२० मध्ये प्रकाशित झालेली पुस्तकं आता मागवत आहोत.
१) ललित, २) ललितेतर, ३) संदर्भ, ४) उपयुक्त व छंदविषयक, ५) विज्ञानविषयक, ६) शिशुसाहित्य, ७) बालसाहित्य, ८) कुमारसाहित्य, ९ अ) मुखपृष्ठ (प्रौढ), ९ ब) मुखपृष्ठ (बाल विभाग) या विभागांबरोबरच ज्या प्रकाशकांनी वर्ष २०२० मध्ये स्वत:च्या लेखनाची पुस्तके प्रकाशित केली असतील त्यांनी १०) `प्रकाशक-लेखक` पुरस्कारासाठी आपली पुस्तके पाठवावीत. ११) जाहिराती व ग्रंथ प्रचार साहित्यही आपण पाठवू शकता.
दि. १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत प्रकाशित झालेल्या (मराठी किंवा मराठी एक भाषा असलेल्या द्वैभाषिक) पुस्तकांची (पुरस्कार योजनेसाठी सप्रेम भेट वगैरे काहीही मजकूर अथवा शिक्का नसलेली) एक प्रत संघाच्या पुढील पत्त्यावर १५ फेब्रुवारी २०२१ पूर्वी पाठवावी. पुस्तकांबरोबर (पाठवत असलेल्या) पुस्तकांची यादी जोडून वरीलपैकी कोणत्या विभागासाठी कोणते पुस्तक पाठवत आहोत याचा कृपया स्पष्ट उल्लेख करावा. (आपण नमूद केलेल्या विभागापेक्षा वेगळ्या विभागात पुरस्कार देण्याचा परीक्षकांना अधिकार असेल.) परीक्षकांचा निकाल/निर्णय अंतिम राहील.
हे सर्व पुरस्कार प्रकाशकांसाठी असून मुखपृष्ठासाठीचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकार अश्या दोघांनाही प्रदान केले जातात.
वरील सर्व विभागांसाठी पुस्तकं निवडताना ग्रामीण वा शहरी असा कोणताही निकष लावला जाणार नाही. त्यामुळे वरील सर्व विभागांसाठी दोनही भागातील प्रकाशकांनी आपली पुस्तकं पाठवावीत. मात्र काही मंडळींची सूचना लक्षात घेऊन या वर्षापासून ग्रामीण आणि निमशहरी भागातून (महानगरपालिका क्षेत्र सोडून बाकीचे विभाग) प्रकाशन व्यवसाय करून साहित्य सेवा करणाऱ्या प्रकाशकांच्या पुस्तकांतून तीन पुस्तकांची निवड करून प्रकाशक संघातर्फे तीन खास पुरस्कार (प्रथम/द्वितीय/उत्तेजनार्थ असे) दिले जाणार आहेत. त्यामुळे वरील सर्व विभागांसाठी पुस्तकं पाठवताना या नवीन पुरस्कारासाठी ग्रामीण आणि निमशहरी विभागातील प्रकाशकांनी आपली उत्कृष्ट निर्मिती असलेले २०२० या वर्षात प्रकाशित झालेले पुस्तक अथवा पुस्तकांची अधिकची एक प्रत पाठवावी व सोबतच्या यादीत त्या पुस्तकाच्या नावापुढे ग्रामीण/निमशहरी विभागासाठी असा स्पष्ट उल्लेख करावा. म्हणजे ही पुस्तकं स्वतंत्रपणे या नवीन विभागासाठी परीक्षकांपुढे निवडीसाठी सादर करता येतील.
पुरस्कारासाठी आलेली पुस्तके प्रकाशकांस परत पाठवली जात नाहीत. या पुस्तकांचा पुढील विनियोग (विक्री-देणगी-संग्रह) करण्याचे स्वातंत्र्य संघाकडे असेल.
पुरस्कारासाठी पात्र होण्यासाठी आपण प्रकाशक संघाचे सभासद असणे आवश्यक आहे. आपण चालू वर्षाची वर्गणी भरलेली नसल्यास कृपया आपले कार्यालयीन कार्यवाह (श्री. भास्कर ढोबळे- ७३५००१५७५६) यांना संपर्क करावा.
स्पर्धेसाठी पुस्तकं पाठवण्याबाबत काहीही शंका असल्यास कृपया संघाचे प्रमुख कार्यवाह श्री. पराग लोणकर (९८५०९६२८०७) यांना संपर्क करावा.
आपली पुस्तकं १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ
२५१ क, शनिवार पेठ, मुठेश्वर चौक, पुणे-४११०३०.
दूरध्वनी: ०२०-२४४८३०३१, ७३५००१५७५६.
रविवार दिनांक २५ एप्रिल २०२१ रोजी वर्ष २०१९ व वर्ष २०२० या दोनही वर्षांच्या पुस्तक व दिवाळी अंकांच्या पुरस्काराचा सोहोळा संपन्न होणार आहे. स्थळ नंतर कळवले जाईल.
धन्यवाद!
– प्रमुख कार्यवाह.