Press "Enter" to skip to content

विविध विभागांमध्ये प्रकाशक संघाचं स्वतःचं अस्तित्व असणं आवश्यक आहे – प्रमुख कार्यवाह पराग लोणकर

आपले प्रमुख कार्यवाह पराग लोणकर यांनी काल नाशिक च्या नवीन शाखेच्या उदघाटन प्रसंगी अप्रतिम भाषण केले ते सोबत देत आहे

नमस्कार, मी पराग लोणकर, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा प्रमुख कार्यवाह, या नाशिक शाखेच्या उद्घाटन प्रसंगी या प्रकाशक संघाच्या शाखाविस्ताराविषयीची आमची भूमिका व्यक्त करायला उभा आहे.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ या नावामध्ये साहित्य व्यवहाराशी निगडीत प्रकाशक, एवढा एकच शब्द असला तरी प्रकाशक संघाचा आवाका आणि व्याप्ती यापेक्षा खूप खूप मोठी आहे. प्रकाशक संघातर्फे महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे मराठी साहित्यासाठी काही करण्याची गरज लक्षात येते, तिथे तिथे प्रकाशक संघ विविध उपक्रमांद्वारे आपलं कार्य करत असतो. हे सारे जे उपक्रम, कार्यक्रम, केले जातात, त्याचा उपयोग, फक्त प्रकाशकांनाच होत नाही, तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लेखक, पुस्तक विक्रेते यांपासून अगदी ग्रंथालयांपर्यंतच्या घटकांना होतो, रसिक वाचकांसाठीही होतोच होतो. विविध विभागांमध्ये असे उपक्रम घेताना बऱ्याचदा त्या त्या विभागातल्या साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था प्रकाशक संघास आमंत्रित करतात आणि आपण त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे तेथे उपक्रम, कार्यक्रम राबवत असतो.

असे उपक्रम अधिक सक्षमपणे करायचे असतील तर विविध विभागांमध्ये प्रकाशक संघाचं स्वतःचं अस्तित्व असणं आवश्यक आहे हे आम्हाला जाणवलं आणि त्यासाठी प्रकाशक संघाच्या शाखा स्थापन करण्याची गरज लक्षात आली. मग आम्ही या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात केली.

प्रकाशक संघाची पहिली शाखा स्थापन करण्यासाठी जे तीन-चार विभाग आमच्या डोळ्यापुढे होते त्यातील प्रत्येक विभागाचा आमच्या अनेक कार्यकारिणी बैठकींमध्ये विचार केला गेला.

आज नाशिक येथे ही जी प्रकाशक संघाची शाखा स्थापना होत आहे, या शाखेचं जे नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ आहे, ते अतिशय अनुभवी मंडळींचं, कर्तबगार मंडळींचं एकत्र येणं आहे. मुख्य म्हणजे यातील प्रत्येक जण संघटनेसाठी मनापासून काम करण्यासाठी अतिशय उत्सुक आहे आणि त्यामुळेच हा प्रकाशक संघाची पहिली शाखा होण्याचा मान आज नाशिकला मिळत आहे. यासाठी नाशिक शाखेचे अध्यक्ष श्री. विलासजी पोतदार, उपाध्यक्ष श्री. विनायकजी रानडे, कार्यवाह श्री. महेंद्रजी देशपांडे, खजिनदार श्री. सुभाषजी सबनीस व सर्व कार्यकारणी सदस्यांचे मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो.

मराठी साहित्यविश्वाला पूर्वीचा सुवर्णकाळ आला तर यात लेखक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते या सर्वांचंच हित आहे. प्रकाशक संघाचे माननीय अध्यक्ष श्री. राजीवजी बर्वे, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे कार्यकारिणी सदस्य प्रकाशक संघाचा प्रत्येक उपक्रम या दिशेने पुढे नेण्याचे काम करत असतो. आज नाशिक शाखेच्या स्थापनेमुळे या प्रवासास गती देण्याच्या दृष्टीने आज खूपच महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे. थोडी अतिशयोक्ती वाटेल, पण भविष्यात, आजचा दिवस, हा साहित्य विश्वामध्ये एक ऐतिहासिक दिवस म्हणून मानला गेला तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण प्रकाशक संघाचा हा शाखा विस्तार पुढील काही वर्षात एकूण साहित्य क्षेत्राची परिस्थितीच बदलून टाकेल असं काहीतरी करून जाणार आहे. याचं पहिलं पाऊल पडतानाच्या या क्षणाचे आपण सारे साक्षीदार झाले आहोत.

एका ध्येयाने झपाटून आम्ही मुख्य शाखेची कार्यकारिणी सदस्य मंडळी जशी एकदिलानं, एकमेकांना सहकार्य करत, एकमेकांचं सहकार्य घेत या अप्रतिम संघटनेसाठी काम करतोय, अशाच एकजुटीने आणि झपाटून जाऊन नाशिक शाखेची मंडळी साहित्य विश्वाची प्रगती आणि उत्कर्ष हे ध्येय ठेवून काम करतील याची मला खात्री आहे. मुख्य शाखेला सल्लागार म्हणून श्री. अनिलजी मेहता, श्री. शरदजी गोगटे आणि श्री. अविनाशजी पंडित ही अतिशय अनुभवी आणि कर्तबगार मंडळी लाभली आहेत. ही मंडळी जशी वेळोवेळी आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देतात, तशीच क्वचित आमच्याकडून काही चूक झाली तर आमचे कान धरायलाही मागेपुढे बघत नाहीत. नाशिक शाखेसाठी, असेच, अतिशय अनुभवी आणि कर्तबगार सल्लागार माननीय वसंतरावजी खैरनार यांच्या स्वरुपात लाभलेले आहेत. नाशिक शाखेच्या कार्यकारिणी मंडळींच्या बाबतीत ते असाच प्रेमाचा धाक ठेवतील याची मला खात्री आहे.

वाचन संस्कृती कमी झाल्याची तक्रार काही मंडळी सतत करत असतात. हे सत्य काही प्रमाणात जरी आपल्याला स्वीकारावं लागलं, तरी साहित्य व्यवहाराचा यापुढे उत्कर्ष होण्यासाठी साहित्य व्यवहाराचं बदललेलं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे. हे बदललेलं स्वरूप सर्वांना समजून देणं हाच प्रकाशक संघाच्या अनेक उपक्रमांचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे हे बदललेलं स्वरूप समजून घेऊन जितकी जास्तीत जास्त मंडळी काम करतील तितकं एकूणच साहित्य व्यवहाराचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे आणि यासाठी आपला प्रकाशक संघ खूपच मोलाची भूमिका बजावत आहे, यापुढे अधिक वेगानं बजावणार आहे.

आपण सर्व मंडळी आजच्या या विशेष सोहोळ्यास आवर्जून उपस्थित राहिलात, याबद्दल अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे व माझ्यातर्फे मी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो, नाशिक शाखेच्या संपूर्ण कार्यकारिणीचे पुन्हा एकदा अभिनंदन व स्वागत करतो आणि माझं हे मनोगत संपवतो.

धन्यवाद!