अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी देण्यात येणा-या अखिल भारतीय जीवन गौरव पुरस्काराचे वितरण मराठा चेंबर आॅफ काॅमर्सच्या सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी यंदा लातूरच्या भारतीय पुस्तकालयाचे संस्थापक संचालक भानुदास जोशी यांना अखिल भारतीय जीवन गौरव पुरस्काराने तर साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी संमेलनाध्यक्ष आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष शशिकला उपाध्ये उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती आणि उत्कृष्ट दिवाळी अंक निर्मिती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, स्वावलंबन जसे एक मूल्य आहे तसेच परस्पर अवलंबन देखील एक मुल्य आहे. त्या मुल्याचा आदर राखत लेखकानेच प्रकाशकाची भुमिका न बजावता प्रत्येक घटकाने आपआपले काम करावे. स्वायत्तते सोबतच समायत्तता देखील मोलाची आहे. प्रकाशन व्यवसायाकडे एका उद्दात्त दृष्टीने पाहिले जाते. प्रकाशन व्यवसायात पूर्वसुरींनी देखील जे उच्चदर्जाचे काम करुन ठेवले आहे, त्याचे स्मरण ठेवले पाहिजे. महाराष्ट्रातील या प्रकाशकीय संस्कृतीवर गांभिर्याने काम होणे आवश्यक आहे. 1832-33 च्या काळात काही बाहेरील समाजांनी भारतीय संस्कृतीवर आणि चालीरितींवर आक्रमण करीत त्यावर त्यांची संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धर्माचा प्रचार प्रसार होईल आणि त्याचे समर्थक वाढतील या दृष्टीने त्यांच्या धर्मग्रंंथाचे मोफत वाटप केले. अशा काळात या आक्रमणाचा सकारात्मकतेने सामाना करण्यासाठी आपल्या समृद्ध आणि उज्जवल संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारी पुस्तके छापून प्रकाशन व्यवसायतील तत्कालीन सुरींनी ते सांस्कृतीक आक्रमण परतवून लावले. प्रकाशन व्यवसाय व्रत म्हणून निष्ठेने करणा-या या प्रकाशकांच्या ऋणातच आपण राहिले पाहिजे.
यावेळी बोलताना डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या की , तांत्रिक प्रगतीच्या या झंजावातात प्रकाशन व्यवसाय करुन त्यात टिकून राहणे सोपे नाही. प्रकाशकांपुढे या तांत्रिक झंजावातामुळे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. ज्यांना जीवन गाैरव पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यांनी अक्षरशः लोटगाडीवरुन पुस्तके विकण्याचा व्यवसाय केला. प्रकाशन व्यवसायात अशा जिद्दीने काम करणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्वे आहेत म्हणुनच हा व्यवसाय टिकून आहे. सांस्कृतिक वारसा जपणे आणि तो पुढील पिढीला हस्तांतरीत करणे या दृष्टीने प्रकाशकांचे मोठेे योगदान आहे.
अखिल भारतीय जीवन गौरव पुरस्कारप्राप्त भारतीय पुस्तकालयाचे संस्थापक संचालक भानुदास जोशी आणि साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने पुरस्कृत ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांनी देखील प्रकाशक संघाचे आभार मानत थोडक्यात मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष शशिकला उपाध्ये यांनी मानपत्रांचे वाचन केले.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी प्रास्ताविक केले, तर स्नेहसुधा कुलकर्णी यांनी आभार मानले. नितीन गोगटे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.