Press "Enter" to skip to content

कोरोनाच्या संकटात साहित्य क्षेत्रातील गरजूंना प्रकाशक संघाचा मदतीचा हात

कोरोनाच्या संकटात आपण सगळेच जण सापडलो आहोत. लॉकडाऊन लागू झालेले आहे. ते किती दिवस चालेल व सर्व कामं पूर्ववत केव्हा चालू होतील याचा अंदाज करणे अवघड झाले आहे. या सर्व परिस्थितीची आपल्या सर्वानाच कल्पना आहे. सर्वच क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेकांपुढे रोजच्या जेवणाचीही समस्या निर्माण झाली आहे. आपल्या व्यवसायाशी संबंधित अनेक जणांनाही मदतीची गरज निर्माण झाली आहे, यापुढे अजूनच होण्याची शक्यता आहे.

आपल्याला वर्षभर सेवा देणारे अक्षरजुळणीकर, मुद्रितशोधक, छपाई कामगार,कार्यालयातील रोजंदारी स्टाफ किंवा या कारणामुळे नोकरी गमावलेले. यांपैकी अनेकांचे रोजचे काम सध्या बंद असल्याने त्यांना मदतीचा हात पुढे करणे प्रकाशक संघाला आवश्यक वाटते. या मंडळींना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीही पैसे कमी पडत आहेत. सरकार या सगळ्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करत असले, तरी वरील मंडळींना त्यांच्या या गरजेला कोणतेही सहाय्य मिळताना दिसत नाहीये. फक्त पुणे नव्हे तर महाराष्ट्रातून अनेकांची माहिती संघाकडे येत आहे आणि आणखी माहितीही आपण घेत आहोत.आपण सर्वांनी या मंडळींच्या पाठीशी उभं राहण्याची तातडीची गरज जाणवत आहे.

तरी आपल्या सर्वांच्या मदतीने या मंडळींना अन्न/धान्य पुरवठ्याकरिता मदत करण्याचे प्रकाशक संघाने ठरवले आहे. त्यासाठी देणग्या स्वीकारणे आपण सुरु करत आहोत. आपल्याला जी रक्कम शक्य असेल (अगदी ५००/- रुपयांपासून) ती आपण द्यावी. त्याचे स्वागतच असेल. आपण आपल्या साहित्यप्रेमी, दानशूर आप्त स्वकीयांकडेही हे निवेदन पाठवावे. त्यांचेकडूनही मदत मिळवावी, जेणेकरून जमा होणारी रक्कम वाढेल. याबाबत नेहेमीप्रमाणेच संपूर्ण पारदर्शकता ठेवली जाईलच. जास्त रक्कम जमा झाल्यास त्यातील काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीही पाठवली जाईल.

सोबत आपल्या बँक खात्याचा तपशील दिला आहे. आपण घरात बसून online आपली देणगी रक्कम प्रकाशक संघाच्या खात्यात भरू शकता. रक्कम खात्यात भरल्यानंतर आपले नाव व आपण खात्यात भरलेली रक्कम न विसरता कळवावी.

आपल्याच मंडळींना मदत करण्यासाठी आपण पुढे याल असा विश्वास वाटतो. प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहे. धन्यवाद!

आपले
श्री. राजीव बर्वे (अध्यक्ष)
सौ. शशिकला उपाध्ये (उपाध्यक्षा)
श्री. पराग लोणकर (प्रमुख कार्यवाह)

आपल्या खात्याचा तपशील:-
*बँक:-* बँक ऑफ महाराष्ट्र,
*शाखा:-* शनिवार पेठ, पुणे.
*खात्याचे नाव:-* अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ.
*बचत खाते क्र:-* २०१३६९४२७३३
*IFSC:-* MAHB0000675

Comments are closed.