Press "Enter" to skip to content

अ. भा. मराठी प्रकाशक संघाच्या उपाध्यक्षपदी श्री. दत्तात्रय पाष्टे यांची एकमताने निवड !

आपल्या प्रकाशक संघाच्या विद्यमान उपाध्यक्षा सौ. शशिकला उपाध्ये या काल आपल्या उपाध्यक्ष पदावरून निवृत्त झाल्या. सौ. शशिकला उपाध्ये या प्रकाशक संघाच्या स्थापनेपासून म्हणजे गेली २५ वर्षे प्रकाशक संघाच्या कार्यकारिणीचा महत्वाचा भाग असून त्यांनी विविध महत्वाची पदेही भूषविली आहेत. कार्यकारिणी सदस्या म्हणून त्या इथून पुढेही पूर्वीइतक्याच जोमाने कार्यरत राहणार आहेत.

सौ. उपाध्ये यांच्या पदनिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर डायमंड प्रकाशनाचे श्री. दत्तात्रय पाष्टे यांची बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. त्यामुळे एका सक्षम, कर्तबगार व कृतीशील व्यक्तीच्या जागेवर दुसरी तितकीच सक्षम, कर्तबगार व कृतीशील व्यक्ती पदभार स्वीकारत आहे ही संघासाठी अतिशय भाग्याची गोष्ट ठरली आहे.

या प्रसंगी माजी उपाध्यक्षा सौ. शशिकला उपाध्ये यांचा संघाचे मा. अध्यक्ष श्री. राजीव बर्वे यांनी सन्मान केला आणि सौ. उपाध्ये यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल गौरवपर भाष्य केले. यानंतर नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय पाष्टे यांचाही मा. अध्यक्षांकडून सन्मान व स्वागत करण्यात आले.

या स्वागतानंतर आपले मनोगत व्यक्त करताना, `सर्व कार्यकारिणी सदस्यांना बरोबर घेऊन प्रकाशक, ग्रंथ विक्रेते आणि एकूणच साहित्य व्यवहारासाठी पुढील काळात अधिक भरीव काम करण्याचा विश्वास,` श्री. पाष्टे यांनी व्यक्त केला.

श्री. दत्तात्रय पाष्टे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्व कार्यकारिणीतर्फे आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो आणि संपूर्ण साहित्य व्यवहाराला उत्कर्षाप्रती नेण्यासाठीच्या त्यांच्या सर्व भावी योजनांना आमचा संपूर्णपणे आणि सक्रीय पाठींबा राहील असे त्यांना आश्वासन देत आहोत.

– प्रमुख कार्यवाह